पंचकर्म म्हणजे काय ?
आयुर्वेद चिकित्सा पद्धतींचा उपयोग 'स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनं' या कारणासाठी म्हणजेच स्वस्थ (निरोगी) माणसाचे आरोग्य टिकविणे व आतुर अर्थात आजारी माणसाचे आजार घालविण्यासाठी होतो. आयुर्वेदाने आजार बरा करण्याबरोबरच तो होऊच नये, यासाठी मार्गदर्शन केले आहे, हेच आयुर्वेदाचे वैशिष्ट्य जाणवते.
आयुर्वेदाने चिकित्सेचे दोन प्रमुख विभाग वर्णन केले आहेत.
१. शोधन चिकित्सा
२. शमन चिकित्सा
१. शोधन चिकित्सा :
शरीरातील वाढलेले व नको असलेले दोष शरीराबाहेर काढून टाकणे व शरीर शुद्ध करणे.
२. शमन चिकित्सा:
चिकित्सेच्या साहाय्याने बिघडलेल्या दोषांचे शरीरात शमन करणे.
सध्या व्यवहारात शमन चिकित्सेचे अनेक प्रकार प्रचलित असून प्रायः याचाच वापर वेगवेगळ्या प्रकारे केलेला आढळतो. आयुर्वेदात शोधन चिकित्सेचे वर्णन प्रथम केले आहे. कारण व्याधी मुक्तीसाठी या चिकित्सा पद्धतीचा फार महत्वाचा वाटा असून, शोधनाद्वारे दोष निघून दोषांचे - 'शेष दोष शमयेत' शमन करावे असे वर्णन आढळून येते. शरीराची शुद्धी ज्या पाच कर्मांद्वारे केली जाते, त्यांना 'पंचकर्म' किंवा 'पंचशुद्धीक्रिया' असे म्हटले जाते. पुढे या पाच कर्मांचे विस्तृत वर्णन करण्यात आले आहे.
१. वमन
२. विरेचन
३. बस्ती
४. नस्य
५. रक्तमोक्षण
१. वमन कर्म:
आमाशय स्थित (पोटाच्या आश्रयाने त्याच्या बिघाडाने होणाऱ्या व्याधी) दोष किंवा कफदोषाचे जेवढे विकार वर्णन केले आहेत, त्यांच्या चिकित्सेसाठी या कर्माचा उपयोग केला जातो. 'वमन कर्म' म्हणजे शरीरात साचलेले कफप्रधान दोष शास्रशुद्ध पद्धतीने औषधी तूप, तेल इ. देऊन शरीर स्निग्ध करून उलटीच्या सहाय्याने शरीरातून बाहेर काढणे, याला 'वमन कर्म' म्हणतात.
निरोगी माणसासाठी वसंत ऋतूमध्ये (फेब्रुवारी, मार्च) शास्रशुद्ध वमनाचा आदेश आहे, जेणेकरून त्याला वर्षभर कफविकार होत नाहीत. आजारी माणसासाठी आजाराच्या स्वरूपानुसार विशिष्ट औषधी सिद्ध तूप किंवा तेल म्हणजे स्नेहपान देऊन (५ ते ७ दिवस) नंतर ज्येष्ठमधाचा काढा, उसाचा रस किंवा दूध यांपैकी कोणतेही एक द्रव पदार्थ आकंठ पाजून उलटी करविली जाते. पित्त पडेपर्यंत झालेली उलटी (वमन) उत्तम मानली जाते. यात स्नेहपानामुळे शरीरातील दोष कोठ्यात (आमाशयात) आणून मग उलटीच्या द्रव्यांसोबत मुखावाटे शरीराबाहेर टाकले जातात. म्हणजे समूळ रोग नष्ट होण्यास मदत होते. वमनानंतर क्रमाक्रमाने आहार वाढवला जातो. याला संसर्जन कर्म म्हणतात.
२. विरेचन कर्म:
विरेचन म्हणजे रेचन किंवा जुलाब. पूर्वी दर आठ किंवा पंधरा दिवसांनी रेचं होण्याची पद्धत होती. पंचकर्मापैकी या कर्माचा सर्रास वापर आजही अनेक वैद्य करतात. पित्तदोषज विकारांवर विरेचन श्रेष्ठ आहे. नुसतेच जुलाबाचे औषध घेतल्यास आतड्यांना ताण पडतो. पण शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजेच औषधी सिद्ध तूप (३/५/७) दिवस देऊन पित्त शाखांमधून कोठ्यात आणून मग जुलाबाचे औषध दिल्यास विरेचन चांगले होते.
स्वस्थ माणसाने शरद ऋतूमध्ये (सप्टेंबर, ऑक्टोबर) विरेचन कर्म केल्यास वर्षभर पित्ताचा त्रास कमी होतो. या ऋतूत (शरद) नैसर्गिकरित्या पाऊस संपून ऊन पडल्याने एकदम उष्णता व पित्त वाढलेले असते. म्हणून त्याला विरेचनाद्वारे काढून टाकल्यास पित्ताचे आजार होत नाहीत.
३. बस्ती कर्म:
आमाशयासाठी 'वमन' पच्चमानाशयासाठी विरेचन हि दोन महत्वाची कर्मे झाल्यानंतर पक्वाशय (मोठे आतडे) यावर कार्य करणारे बस्ती कर्म असून आयुरेवडने त्याला 'अर्धीचिकित्सा' असे संबोधून त्याचे महत्व सांगितले आहे. 'बस्ती कर्म' म्हणजे व्यवहारी भाषेत 'एनिमा' देणे. पण एनिमा म्हणतात त्याचा उपयोग केवळ संडास साफ करण्यासाठीच होतो, असा एक गैरसमज आहे.
आयुर्वेदाने बस्ती चिकित्सेची व्याप्ती फार मोठी केली असून वातदोषाचे निर्मिती मोठ्या आतड्यात होते, असे आयुर्वेद मानते आणि त्याचे शमन या बस्ती कर्माद्वारे मोठ्या आतड्यात केले जाते. जर वातावर नियंत्रण ठेवले तरच तिन्ही दोष नियंत्रित राहू शकतात. म्हणून बस्ती कर्माला 'अर्धीचिकित्सा' असे संबोधले आहे.
स्वस्थ माणसाने वर्षाऋतूत पावसाळ्यात बस्ती कर्म केल्यास वर्षभर वाताचा त्रास होत नाही. बस्तीचे दोन मुख्य प्रकार आहेत -
१. निरुह बस्ती (आस्थापन बस्ती)
२. अनुवासन बस्ती (स्नेह बस्ती)
४. नस्य कर्म:
नस्य म्हणजे नाकात औषध टाकणे. डोके, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजेच कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा इ. अवयवांच्या विकारावर नस्य कर्माचा उपयोग होतो. नसल्यामुळे केस गळणे थांबते, डोके दुखी, अर्धाशिशी, डोळे दुखणे, कोरडे पडणे, डोळ्यांची जळजळ, जुनाट सर्दी, श्वास इ. अनेक व्याधी बऱ्या होण्यास मदत होते.
निरोगी माणसाने रोज नाकात २-२ थेम्ब तेल, तूप सोडल्यास बाहेरील धूर, धूळ, परागकण इ. गोष्टींपासून त्याचे रक्षण होते.
५. रक्तमोक्षण कर्म:
रक्तमोक्षण शब्दाचा अर्थच मुळी 'अशुद्ध रक्त शरीराबाहेर काढून टाकणे' असा आहे.
आयुर्वेदाने 'वात, पित्त, कफ' हे तीन दोष 'रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सप्तधातू आणि मल, मूत्र, व स्वेद हे तीन मल यांचे वर्णन केलेले आहे. यापैकी त्रिदोषांचे कर्म हे अन्नवहन स्रोतात होत असते. पण धातूंमधील दोष रस रक्त संवहनामार्गे कोठ्यात आणि कोठ्यातून पुन्हा धातूपर्यंत नेण्याचे काम प्रामुख्याने रक्त करत असते. म्हणून त्रिदोषानंतर रक्ताला आयुर्वेदाने महत्व दिले आहे.
रक्तमोक्षण हे सुईद्वारे, शृंग (शिंग) पोकळ अलाबू इ. यंत्राद्वारे आणि जलौका (जळवा) द्वारे करतात. आल्यपिक चिकित्सा किंवा आशुकारी (त्वरित) गुण देणारी चिकित्सा म्हणूनही याचे वर्णन केले जाते.
अशा पाच कर्माच्या सहाय्याने आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य 'स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकविणे व रोगी माणसाला आरोग्य प्रदान करणे' हे पाळता येते.
0 टिप्पण्या